बाराबंकी : शरयू नदीच्या पुरामुळे आणि नदीची धूप झाल्याने काठावरील गावांमध्ये घबराट पसरली आहे. नदीपलिकडे असलेल्या गावांमधील ऊस, भाताचे पिक पुराच्या विखख्यात आहे. लोकांनी आपली घरे वाचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नदीची पाणीपातळी १०५.६२६ मीटर झाली आहे. या नदीची इशारा पातळी १०६.०७० मीटरवर आहे. पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रामनगर तालुक्यातील नदी पलिकडील जमका, परशुरामपुर, फाजिल, पुरनपुर, खुज्झी ही गावे पुराच्या विळख्यात आहेत. बोटी सुरू नसल्याने या गावांपर्यंत पोहोचणे मुश्किल आहे. रस्ता मार्गे या गावांमध्ये पोहोचण्यासाठी बहराईच जिल्ह्याच्या सीमेवरून जवळपास ७० किमी अंतर पार करावे लागेल. जमका गावातील भात, ऊस शेती गुरुवारी पुराच्या विळख्यात सापडली. अनेकांच्या झोपड्या, घरे पाण्यात बुडाली आहेत.
सिरौलीगौसपूर तालुक्यातील नदीकाठावरील गावांतही पुराचे पाणी पसरले आहे. पर्वतपूर, तेलवारी गावातील १२ घरे पुरात बुडाली आहेत. रामनगर, सिरौलीगौसपुर तालुक्यातील प्रशासन सतर्क आहे. शरयू नदीच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवण्यात आले आहे असे उप जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी सांगितले.