सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गुळाची आवक घटली आहे. काही व्यापारी परस्पर बाहेर व्यापार करीत असल्याने त्याचा फटका हुमालांना बसत आहे. त्यामुळे गुळाचे सौदे बंद पाडण्यात आले होते. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी संचालक, व्यापारी, खरेदीदार आणि हमालांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी अशी संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती आठ दिवसात निर्णय घेणार आहे. तशी माहिती बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.
काही खरेदीदार व अडते सांगलीत परवाना असताना गुळाचा व्यापार परस्पर बाहेर करतात, असा आक्षेप हमालांचा आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागली आहे. समितीने यार्डाबाहेर व्यापाऱ्यांनी व्यापार करू नये, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला होता. मात्र तोडगा न निघाल्याने संबंधित व्यापाऱ्यांच्या गुळाचे सौदे हमालांनी बंद पाडले होते. त्यावर बाजार समिती पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी हमालांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हमालांनी माघार घेत सौदे सुरु केले. याबाबत सभापती शिंदे म्हणाले की, गूळ व्यापार प्रश्नावर तोडगा काढण्यात कोणतीही अडचण नाही. समिती स्थापन करण्यात आली असून सर्वांच्या सोयीस्कर निर्णय होईल. त्यामुळे व्यापारात वाढ होईल.