ऊस दरासाठी शेतकरी संघटनेची एकजूट

सोलापूर : दरवर्षी जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखानदार एकत्र येत ऊस दर ठरवतात. त्यासाठी ते पक्ष, गट, संघटना बाजूला ठेवतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनीही स्वतःच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी, बळीराजा, जनहित, जनशक्ती अशा विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येवून ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघटनांच्यावतीने २३ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी ऊस दराची मागणी केली जाईल. पंढरपुरातील शिवाजी चौकात ही ऊस परिषद होणार आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माऊली हळणवर, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, सुभाष मस्के यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेऊन ऊस दर संघर्ष समितीची घोषणा केली. हळणवर यांनी सांगितले की, कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस दर ठरवताना एकत्र येतात. त्यावेळी ते आपले पक्ष, गट ही सर्व बंधने बाजूला ठेवतात. मग आपणच दूर का राहायचे असे आमचे म्हणणे आहे. आम्ही एकत्र आलो आहोत. हवा तो दर मिळवू, असे त्यांनी सांगितले. स्वाभिमानीचे सचिन पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी चळवळीतील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा विचार केला. तर बळीराजा शेतकरी संघटनेचे दीपक भोसले यांनी ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून ऊस पिकाचा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेऊन दर ठरवला जाईल. शेतकऱ्यांची कारखानदारांकडून होणारी पिळवणूक थांबवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here