चंदीगढ : अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्यभरात गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये या गव्हाच्या कापणीच्या हंगामात पिकाचे १० ते १५ टक्के नुकसान होवू शकते. राज्यात एकूण ३४.९० लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे, त्यामध्ये फाल्जिकाचा समावेश आहे. अहवालानुसार, या जिल्ह्यात गहू पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. मोगा, भठिंडा, मनसा, मुक्तसर, फिरोजपूर, कपूरथला आणि पटियाला या जिल्ह्यांमध्ये १५ ते २० टक्के पिक खराब झाले आहे. कृषी संचालक डॉ. गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीच्या अनुमानानुसार या वर्षी गव्हाची कापणी १० ते १५ टक्के कमी होईल अशी अपेक्षा आहे.
पंजबा कृषी विद्यापीठाच्या (पीएसयू) हवामान बदल आणि कृषी हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख पवनीत कौर किंगरा यांनी सांगितले की पावसासोबतच जोरदार वाऱ्याने अधिक नुकसान केले आहे. वादळी वारे, पावसाने या टप्प्यातील कापणीस उशीर होईल. संगरुरमध्ये काल रात्रीही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथील गव्हाचे पिक उद्ध्वस्त झाले आहे. शिवाय, शेतांमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गहू खराब होण्याची शक्यता आहे. पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. आपल्या शेताचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्यासाठी ते शेतांमध्ये जात आहेत.