पुणे : साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सुरुवातीच्या संकेतानुसार २०२२-२३ च्या ऊस गळीत हंगामासाठी महाराष्ट्रात उच्चांकी ऊस लागवड क्षेत्र नोंदवण्यात आल्याचे दिसून येत आहे. दि इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. साखर कारखान्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील गळीतासाठी १४.८५ लाख हेक्टर ऊस उपलब्ध असेल. साखर कारखान्यांकडून १,३४३ लाख टन उसाचे गाळप होऊन १३८ लाख टन साखर उत्पादन होईल. यापैकी १२ लाख टनाचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला जाईल. महाराष्ट्राने २०२१-२२ या ऊस गळीत हंगामात आताप्यंत सर्वाधिक ऊसाचे गाळप आणि साखर उत्पादन केले होते. साखर कारखान्यांनी १,३२०.३१ लाख टन उसाचे गाळप करुन १३७.२७ लाख टन साखर उत्पादन केले होते. हा गळीत हंगाम १७३ दिवस सुरू राहिला होता.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ऊस क्षेत्रात चांगली वाढ दिसून आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ३.९१ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस शेती करण्यात आली आहे. गेल्या हंगामात मराठवाड्यात ३.३९ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. तर कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या पारंपरिक ऊसाच्या बेल्टमधील ऊस क्षेत्र जैसे थे स्थिर राहिले आहे. धरणांत पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत ऊसाला प्राधान्य दिले आहे. साखर आयुक्त कार्यालयाने एक अॅप लाँच केले असून त्यातून शेतकऱ्यांना आपल्या ऊस क्षेत्राची नोंद करण्यास मदत मिळेल. या प्रक्रियेतून गळीत हंगामाच्या व्यवस्थेत पारदर्शकता येईल, असा विश्वास साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे.