नवी दिल्ली : इंधन विपणन कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) २०२४-२५ साठी चौथ्या तिमाहीच्या (Q 4 ) दुसऱ्या टप्प्यासाठी देशभरातील उत्पादकांनी ऑफर केलेल्या सुमारे १०० कोटी लिटरपैकी सुमारे ९३ कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले आहे. ओएमसींनी सुरुवातीला ईएसवाय २०२४-२५ साठी सुमारे ८८ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या होत्या.
या वाटपामध्ये मक्याचा सर्वाधिक वाटा ५८.१६ टक्के (सुमारे ५४.३४ कोटी लिटर) आहे. त्यानंतर बी हेवी मोलॅसिस १९.६८ टक्के (सुमारे १८.३९ कोटी लिटर), खराब झालेले अन्नधान्य १४.५७ टक्के (सुमारे १३.६१ कोटी लिटर), उसाचा रस ७.३ टक्के म्हणजेच सुमारे ६.८३ कोटी लिटर आहे. याशिवाय सी हेवी मोलॅसिसचा वाटा ०.२० टक्के म्हणजे अंदाजे ०.२७ कोटी लिटर इतका आहे.
पहिल्या टप्प्यात इंधन विपणन कंपन्यांनी ईएसवाय २०२४-२५ साठी ९१६ कोटी लिटरच्या आमंत्रित बोलींविरूद्ध सुमारे ८३७ कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले. तर एकूण ऑफर केलेले प्रमाण सुमारे ९७० कोटी लिटर होते. आत्तापर्यंतचे एकूण ९३० कोटी लिटरवर इथेनॉल वाटप पोहोचले आहे.
सरकार इथेनॉल ब्लेंडिंग विथ पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम सक्रियपणे राबवत आहे, ज्यामुळे तेल विपणन कंपन्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकण्याची परवानगी मिळते. ईएसवाय २०२३-२४ यांदरम्यान, पेट्रोलमध्ये एकत्रित इथेनॉल मिश्रण १४.६ टक्के पर्यंत पोहोचले आहे. सध्याच्या ईएसवाय २०२४-२५ साठी, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १८ टक्क्यापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
सरकारने ईएसवाय २०२५-२६ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ते साध्य करण्याचा विश्वास सरकारला आहे. तथापि, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, सुमारे १,०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल, जे इतर वापरांसह एकूण १,३५० कोटी लिटर असेल.