नवी दिल्ली:केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलिअम नियोजन आणि विश्लेषण विभागाच्या जून महिन्याच्या मासिक अहवालानुसार, देशात जून महिन्यातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची पातळी आजवरची सर्वाधिक १५.९० टक्क्यांवर गेली आहे.प्रथमच हा उच्चांकी टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे.नोव्हेंबर २०२३ ते जून २०२४ या काळातील एकूण इथेनॉल मिश्रणाची सरासरी पातळी १३ टक्के इतकी राहिली. देशात २०२०-२२मध्ये १० टक्के, डिसेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात १२.१० टक्के मिश्रण पातळी गाठण्यात यश आले होते.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे.यासाठी पंधरा राज्यांमध्ये पंधरा क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यांमध्ये देशभरातील ७८ जिल्ह्यांचा समावेश आहे.महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि हरियाणा या १५ राज्यांत मक्याच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.एक जुलैअखेर देशातील एकूण ८१,९६३ पेट्रोल पंपांपैकी १४,४७६ पेट्रोल पंपांवरून इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री सुरू आहे.ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन(एआईपीडीए)चे प्रवक्ता अली दारुवाला म्हणाले की, केंद्र सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला चालना दिली जात आहे.देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीचे आदेश आहेत.२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे.