नवी दिल्ली : वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ८.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी ते ५ टक्के इतके होते. तर २०१३-१४ मध्ये याचे प्रमाण अवघे १.५ टक्के होते. केंद्र सरकारने साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी लागू केलेल्या धोरणात्मक उपाय योजनांमुळे पुरवठा वाढण्यास मदत झाली आहे.
सरकारने इंधन आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि वाहतूक क्षेत्रात जैव इंधनाचा वापर वाढविण्यासाठी उद्दीष्ट निश्चित केले आहे. सध्या देशातील गरजेच्या ८५ टक्के इंधन आयात केले जाते. त्यामुळे इथेनॉल मिश्रण १० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर इंधन आयातीमध्ये घट होऊ शकते. जसजसा पुरवठा वाढेल, तसतसा इथेनॉल मिश्रण १० टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
साखर, शुगर सीरप, अतिरिक्त तांदूळ आणि मका यांच्या इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची व्याप्ती वाढवणे हे सरकारचे आणखी एक मोठे पाऊल होते. धान्याचा समावेश केल्याने इथेनॉल उत्पादनात इतर अनेक राज्यांकडून मदत मिळू शकेल. यापूर्वी इथेनॉल उत्पादन फक्त युपी, महाराष्ट्र आणि कर्नाटकपर्यंत मर्यादीत होते. कारण, येथे ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.