कोल्हापूर : केंद्र सरकारने ईबीपी कार्यक्रमांतर्गत इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. त्याला आता गती आली आहे. त्यामुळे गेल्या इथेनॉल वर्षाच्या तुलनेत यंदा इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १९.७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर फेब्रुवारीअखेर सरासरी मिश्रण १७.९८ टक्के इतके झाले आहे. २०२५-२६ पर्यंत इथेनॉल वर्षात २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. याकडे वेगाने वाटचाल सुरू असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी ७८. १ कोटी लिटर इथेनॉल मिळाले. तेल कंपन्यांना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत एकूण २७८.९ कोटी लिटर इथेनॉलची उपलब्धता इथेनॉल उत्पादकांकडून झाली आहे. फेब्रुवारीमध्ये ७९.५ कोटी लिटर मिश्रण झाले. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारीअखेर ३०२.५ कोटी लिटर इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये करण्यात आले असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षात हे प्रमाण १४.६० टक्के इतके होते. यंदाच्या वर्षात हे प्रमाण १७.९७ टक्केपर्यंत वाढले आहे. यासाठी राष्ट्रीय जैव इंधन धोरण, २०१८ अंतर्गत, सरकारने पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, मका, खराब अन्नधान्य, गोड ज्वारी, साखर बीट इत्यादी विविध कच्च्या मालाला परवानगी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांना पुरवलेल्या इथेनॉलमध्ये मक्याचा प्रमुख वाटा आहे. अनुदानित तांदळाचाही वापरही सुरू असल्याने इथेनॉल उत्पादन चांगले वाढेल असा अंदाज आहे.