हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला यंदाच्या गाळप हंगामात चांगले यश येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०१८पासून सुरू झालेल्या या हंगामात तेल वितरण कंपन्यांनी २६० कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार केले आहेत. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे लक्ष्य १० टक्के मिश्रित पेट्रोल असून, खरेदी करार केलेले इथेनॉल ७.५ टक्क्यांपर्यंत आहे. आतापर्यंत २३ फेब्रुवारीपर्यंत एकूण करारांच्या ४९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे.
नॅशनल फोरम ऑफ शुगर कन्सल्टंट आणि राष्ट्रीय शर्करा संस्थान, कानपूर यांच्या वतीने दिल्लीत इथेनॉल धोरण, उत्पादकता आणि लाभ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अबिनाश वर्मा यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी गेल्या हंगामात साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांन १५० कोटी लिटर इथेनॉल पुरवल्याची माहिती दिली. इथेनॉल मिश्रणाच्या १० टक्के टार्गेटचा तो केवळ ४.८ टक्के भाग होता.
वर्मा म्हणाले, ‘सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना आणली. तसेच इथेनॉलच्या खरेदी दरातही वाढ केली. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी नव्याने युनिट उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यातून पुढच्या हंगामात इथेनॉल उपलब्ध होणार आहे.’ दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ३३० कोटी लिटर इथेनॉलची गरज असल्याचेही वर्मा यांनी सांगितले. नॅशनल फोरम ऑफ शुगर कन्सल्टंट या संस्थेचे संचालक विनय कुमार म्हणाले, ‘उद्योगासाठी इथेनॉल महत्त्वाचे उत्पादन आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते सुरक्षित आहे. तसेच यामुळे विदेशी चलनाची बचत होणार आहे. शेतकऱ्यांचाही यातून लाभच होणार आहे.’ केंद्राने जून २०१८मध्ये जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये ४ हजार ४४० कोटी रुपये हे केवळ इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी कर्ज रुपाने देण्यात आले होते.
सप्टेंबर २०१८ मध्ये अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करून थेट उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ५९.१९ रुपये प्रति लिटर केला होता. तर, बी-ग्रेड इथेनॉलचा दर ५२.४२ रुपये प्रति लिटर केला होता. राष्ट्रीय शर्करा संस्थानचे संचालक नरेंद्र मोहन यांनीही केंद्राचा इथेनॉल खरेदी दर वाढवण्याचा निर्णय फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे जगात साखरेचे दर घसरत आहेत. त्यातून कारखाने अडचणीत आले आहेत. त्यामुळे उसाच्या बंपर उत्पादनानंतरही साखरेला इथेनॉल हा उत्तम पर्याय मानला जात आहे.’
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp