नवी दिल्ली : भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा स्तर ९.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. भारताने २०२२ च्या अखेरपर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले होते.
इथेनॉल मिश्रण कार्यक्रमातून कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे, कार्बन उत्सर्जनात कपात कणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश आहे.
पुरी यांनी सोमवारी ट्वीट केले आहे की, देशातील इंधन वितरण कंपन्यांनी (OMCs) आज पेट्रोलमध्ये ९.९९ टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. वार्षिक उद्दीष्टाच्या खूप आधी हे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. भारताने २०२५-२६ पर्यंत २० टक्के मिश्रणाचा टप्पा गाठण्यासाठी तयारी केली आहे.