नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे साखर कारखान्यांच्या महसुलात वाढ होणार आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय खाद्य आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, साखर कारखआन्यांना चालू हंगामात तेल वितरण कंपन्यांना इथेनॉल विक्री करून १५,००० कोटी रुपयांचे महसूल मिळण्याची शक्यता आहे. मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी गेल्या तीन हंगामात २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत इथेनॉल विक्रीतून २२,००० कोटी रुपये कमावले आहेत.
मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, ६०-७० लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा असल्याने साखरेच्या एक्स मिल दरांवर दबाव वाढला आहे. त्यामुळे कारखान्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस बिलाची थकबाकी वाढली आहे.
ज्योती यांनी सांगितले की, अतिरिक्त साखरेच्या समस्येतून दूर होण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन देत आहे. तेल वितरण कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. भारतात इथेनॉल उत्पादनाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून या उद्योगात मोठे बदल झाले आहेत.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.