नवी दिल्ली : चीनी मंडी
केंद्राच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला तेल कंपन्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ५ टक्के मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण करण्याचा तेल कंपन्यांचा इरादा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढू लागल्याने, इथेनॉलमुळे कंपन्यांची चांगली बचत होत आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांनीही तेल कंपन्यांची गरज भागवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
गेल्या वर्षी १ डिसेंबर २०१७पासून सुरू झालेले इथेनॉल पुरवठा वर्ष येत्या ३० नोव्हेंबरला संपणार आहे. तेल कंपन्यांना सुमारे १६३ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. यातून पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण होऊ शकते. सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी ११३ कोटी लिटर इथेनॉल कारखान्यांकडून उचलले आहे. २०१८-१९च्या हंगामासाठी तेल कंपन्यांनी ३२९ कोटी लिटर इथेनॉलची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दहा टक्के इथेनॉल मिश्रण शक्य होणार आहे.
कंपन्यांची बचत
इंडियन शुगर मिल असोसिएशनचे महासंचालक अबिनाश वर्मा म्हणाले, ‘तेल कंपन्यांसाठी इथेनॉल मिश्रणाची अशी कोणतिही सक्ती करण्यात आलेली नाही. पण, केंद्र सरकार याचा पाठपुरावा करत असून, तेल कंपन्याही आता त्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत.’
दिल्लीचा विचार केला तर, पेट्रोलची किंमत ४० रुपये ४५ पैसे आहे. त्यात सर्व प्रकारचे कर लागू केले, तर पेट्रोल ८० रुपये ७३ पैशांना जाते. सी ग्रेड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत ४० रुपये ८५ पैसे आहे. त्यावर सर्व कर लागू केले तर ते इथेनॉल ६१ रुपये ९८ पैशांना मिळते. मात्र, तेल कंपन्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलही त्याच दराने विकत असल्याने त्यांना लिटरमागे १८ रुपेय ७६ पैशांचा फायदा होत आहे. यातून कंपन्यांना यावर्षी ३ हजार कोटी रुपयांचा फायदा होईल.
मार्जिन होणार कमी
इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ झाल्यामुळे पुढच्या वर्षी तेल कंपन्यांचे मार्जिन कमी होणरा आहे. पुढच्या वर्षी थेट उसाच्या रसापासून केलेले इथेनॉल ५९ रुपयांना, बी ग्रेड मळीपासून केलेले इथेनॉल ५२ तर सी ग्रेड मळीपासून केलेले इथेनॉल ४३.४६ रुपयांना खरेदी केले जाणार आहे. कारखान्यांनी सी ग्रेड इथेनॉल पुरवले, तर इथेनॉलची किंमत कंपन्यांना ६५.४६ रुपयांपर्यंत जाते यात कंपन्यांना लिटरमागे १५.२७ रुपयांचा फायदा आहे. बी ग्रेड इथेनॉल त्यांना ७७.४२ रुपयांना पडेल आणि त्यांचे लिटरमागे फक्त ३ रुपये ३० पैसे वाचतील. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार बी ग्रेड इथेननॉलपासून कंपन्यांची केवळ २५ टक्के गरज भागेल. पण, हे सगळं गणित कच्चे तेल ७९ ते ८० डॉलर प्रति बॅरलच राहिल, हे गृहित धरून केले आहे.
साखर कारखान्यांचा फायदा
इथेनॉलच्या किमतींमुळे साखर कारखान्यांचा मात्र फायदा होणार आहे. बी ग्रेड मळीपासूनच्या इथेनॉलला ५२.४३ रुपये असा चांगला दर मिळणार आहे. त्यातून कारखान्यांना त्यांचा तोटा भरून काढण्यास मदत होईल. त्याचबरोबर सरकारने तेल कंपन्यांना वाहतूक खर्च काटेकोरपणे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साखर कारखाने इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. जूनमध्ये ज्यावेळी सरकारने इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठीच्या कर्जावर व्याजात सवलत देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सरकारडे असे १५० अर्ज आल्याची माहिती अबिनाश वर्मा यांनी दिली. सरकारकडून देण्यात आलेल्या ४ हजार ४०० कोटी रुपयांच्या अल्पमुदतीच्या कर्जातून १०० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती वाढेल, अशी अपेक्षा वर्मा यांनी व्यक्त केली.