नवी दिल्ली : देशात इथेनॉल डिस्टिलरी युनिट्सची क्षमता २०२५ पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. भारत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चितपणे पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी संवाद साधताना पांडे म्हणाले, मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबींचा ताळमेळ घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे देशात इथेनॉल डिस्टिलरी क्षमता २०२५ पर्यंत दुप्पट होईल. यातून आपण २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठू शकतो.
ग्राहक, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या एका अध्यादेशानुसार पांडे यांनी सांगितले की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. इथेनॉलला इंधन म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. हे स्वदेशी, प्रदूषण कमी करणारे आहे. आणि पर्यावरण रक्षकही आहे. कारण ई २० ईंधनाच्या वापराने कार्बन मोनॉक्साईडचे उत्सर्जन ३०-५० टक्के आणि हायड्रोकार्बन २० टक्क्यांनी कमी होईल.
मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मंत्रालयाने सांगितले की, सरकारने साखर कारखाने आणि डिस्टिलरींना त्यांची आसवनी क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने त्यांना बॅंकांकडून कर्ज देण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. सरकारकडून व्याजावर सहा टक्के सवलत मिळेल.
त्यांनी सांगितले की, क्षमतेत वाढ आणि नव्या डिस्टिलरीमुळे ग्रामीण भागात ४१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून कृषी अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. याशिऊ कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च होणारे ३०,००० कोटी रुपये वाचतील.