बेंगळुरू : कर्नाटकात केवळ ऊस नव्हे तर मक्का आणि भाताचा वापर करून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉल धोरण (Ethanol policy) तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी दिली. प्रस्तावित धोरणांसाठी शिफारसी तयार करण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीची लवकरच स्थापना केली जाईल असे ते म्हणाले एस. निजलिंगप्पा संशओधन संस्थेच्या तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची एक समिती महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. मी इतर राज्यांतील इथेनॉल उत्पादन आणि प्रचार धोरणाच्या अभ्यासासाठी दिल्लीला जात आहे, असे ते म्हणाले.
मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, पेट्रोलियम कंपन्या आता साखर कारखान्यांनी उत्पादीत केलेले इथेनॉल खरेदी करत आहेत. मात्र, राज्यात इथेनॉलचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि उद्योगांना प्रोत्साहन करण्यासाठी ऊस, मक्का आणि भातावर आधारित इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची योजना तयार केली जात आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही इथेनॉल धोरण बनविण्यास सहमती दर्शविली आहे. यामध्ये इथेनॉल उत्पादकांना अनुदान, बँक कर्ज, परवाना प्रक्रीयेच्या सुविधा दिल्या जातील.