इथेनॉल उत्पादनासाठी भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) तांदूळ पुरवठा थांबवल्यानंतर यावर्षी १२ टक्के इथेनॉल मिश्रित उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारने डिस्टिलरीजचे उत्पादन पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या अंतर्गत तांदूळ आणि मक्यापासून उत्पादित इथेनॉलच्या किमती वाढविण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान यासंदर्भात अद्याप अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉलचा खरेदी दर प्रती लिटर ४.७५ रुपयांनी वाढून ६०.२९ रुपये प्रती लिटर केल्याचे व्यापार उद्योगातील सूत्रांनी सांगितले. खराब आणि तुटलेल्या तांदळापासून उत्पादित जैव इंधनासाठी हा दर लागू आहे. मक्क्यापासून उत्पादित करण्यात आलेल्या इथेनॉलचा नवीन दर ६.०१ रुपये प्रती लिटरने वाढवून आता ६२.३६ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे. हे दोन्ही दर सात ऑगस्टपासून लागू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. तर याबाबत अद्याप अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही असे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर भाष्य केले नाही.
डिसेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या इथेनॉल हंगामात २३ जूनअखेर इंधन वितरण कंपन्यांनी ११.७७ टक्के मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. सरकारने २०२३-२४ मध्ये इथेनॉल हंगाम नोव्हेंबर ते ऑक्टोबर असा केला आहे. अन्न महामंडळाने तांदूळ पुरवठा बंद केल्यानंतर अनेक डिस्टिलरीजनी उत्पादन बंद केले आहे. डिस्टिलरीजकडून सरकारकडे दरात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. आता उत्पादन बंद झाल्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मिश्रणाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी ४ ऑगस्ट रोजी ऊसाची अपेक्षित उपलब्धता लक्षात घेऊन पुढील हंगामासाठी सुधारित इथेनॉलच्या किमतीची शिफारस करण्यासाठी एक आंतर मंत्री गट स्थापन करण्यात आला असल्याचे सांगितले होते.