कोल्हापूर, दि. 14 सप्टेंबर 2018 : केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात मोठी वाढ केली आहे. मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्यांसाठी प्रतिलिटर 52 रूपये 43 पैसे तर उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी 59 रुपये 13 पैसे दर जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील मोलॅसिस (मळी) पासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सुमारे 14 साखर कारखान्यांना मोठा फायदा होणार आहे. इथेनॉल दरवाढीची अमलबजावणी डिसेंबर 2018 पासून होणार आहे.
सरकार ने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दरामुळे हैराण झालेल्या वाहनचालकांनाही कमी दरातील इंजन देण्यास मदत होणार आहे. याशिवाय देशात अतिरिक्त ठरणाऱ्या उसाचा ही प्रश्न निकालात निघणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 22 साखर कारखान्यांपैकी कुडित्रे तील कुंभी-कासारी, दालमिया, गडहिंग्लज, कागल येथील शाहू, सरसेनापती व शिरोळ कारखाना मळीपासून इथेनॉल निर्मिती करतात. कोल्हापुरातील साखर कारखाने अद्यापि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करत नाहीत. त्यामुळे भविष्यात या साखर कारखान्यांना उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याकडे भर द्यावा लागणार आहे.