नवी दिल्ली : भारत हा जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश आहे आणि स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करत आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी म्हटले आहे. मंत्री पुरी यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये, भारताने या वर्षी जानेवारीपर्यंत पेट्रोलमध्ये 19.6 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य केले आहे आणि लवकरच 20 टक्यांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे यावर भर दिला.
देशाने मूळ 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्षे आधीच इंधन आयात आणि उत्सर्जन कमी करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून हा टप्पा गाठला आहे. याबाबतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दशकात इथेनॉल मिश्रण उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे, कारण इथेनॉल उसापासून मिळते. त्यातून ग्रामीण रोजगार निर्माण झाला आहे, CO2 उत्सर्जन कमी झाले आहे आणि परकीय चलनही वाचले आहे.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसह सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी या क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. आणि देशभरात विविध इथेनॉल-पेट्रोल मिश्रणे सादर केली आहेत. मंत्री पुढे म्हणाले की, E100 इंधन आता देशभरातील ४०० हून अधिक आउटलेटवर उपलब्ध आहे, जे भारताला स्वच्छ, हिरव्या भविष्याच्या जवळ घेऊन जात आहे. हा प्रनवोपक्रम आणि शाश्वततेचा प्रवास आहे. E100 हे इंधन विविध वाहनांशी सुसंगत आहे, ज्यामध्ये पेट्रोल, इथेनॉल किंवा या दोघांच्या कोणत्याही मिश्रणावर चालणारी फ्लेक्स-फ्युएल वाहने समाविष्ट आहेत. योग्य पायाभूत सुविधांसह मुख्य प्रवाहातील इंधन बनण्याची क्षमता त्यामध्ये आहे.