नवी दिल्ली : फिनलंडकडून आसाममध्ये बायो-रिफायनरी स्थापन करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये बांबूपासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. फिनलंडच्या दुतावासातील काउन्सिलर (व्यापार आणि गुंतवणूक) किम्मो सिएरा म्हणाले की, भारत आणि फिनलंडचे लक्ष ऊर्जेवर आहे. आणि फिनलंडचा भारतामध्ये जैवइंधन आणि नवीकरणीय ऊर्जेतील गुतंवणुकीवर भर असेल.
‘लाइव्ह मिंट’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत सिएरा म्हणाले की, दोन्ही देशांद्वारे ऊर्जा भागीदारीवर लक्ष केंद्रित केले जाईल. नुमालीगढ ऑइल रिफायनरी लिमिटेड आणि फिनिश कंपनी केम्पोलिस यांचा आसाममध्ये उभारला जाणारा प्रकल्प हा संयुक्त उपक्रम आहे. बांबूचे इथेनॉलमध्ये रुपांतर करण्याचे तंत्रज्ञान यात आहे. या मॉडेलची इतरत्र प्रतिकृती करण्यासाठी मोठ्या भारतीय कॉर्पोरेट्ससोबत सामंजस्य करारदेखील करण्यात आले आहेत.
‘मिंट’ मधील माहितीनुसार, नॉर्डिक पॉवर ग्रीडचा अभ्यास करण्यासाठी आणि भारताच्या अनुषंगाने याची उपयुक्तता तपासण्यासाठी वीज मंत्री आर. के. सिंह या वर्षाच्या अखेरपर्यंत फिनलंडचा दौरा करतील अशी अपेक्षा आहे. या उपायांनी भारताला २०७० पर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जनाच्या वाटेवर जाण्यास मदत होईल. फिनलंडचे नवे डिजिटलीकरण, शिक्षण, स्थिरता, डीईएसआय भागिदारीपासून स्मार्ट ग्रीड विकसित करणे आणि स्थिरतेमध्ये भागिदारी करण्याची अपेक्षा आहे.