चंदीगड ः हरियाणातील साखर कारखान्यांमध्ये आता इथेनॉल निर्मिती होणार आहे. सर्व ११ साखर कारखान्यांमध्ये नियोजनबद्धरित्या इथेनॉल उत्पादन प्रक्रिया केली जाईल. सर्वात प्रथम शाहबाद साखर कारखान्यामध्ये इथेनॉल निर्मिती होईल. सप्टेंबरपर्यंत येथून उत्पादन सुरू होईल. त्याशिवाय कर्नाल आणि पानीपतमध्येही काम सुरू केले जाणार आहे. राज्याचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी ही माहिती दिली. इथेनॉल उत्पादन झाल्यानंतर नफ्यात वाढ होईल आणि तोट्यात सुरू असलेले साखर कारखाने नफ्यात येतील असे त्यांनी सांगितले.
बनवारी लाल यांनी सांगितले की, यावर्षी ऊसाचे गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू केले जाईल. साखर कारखान्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि ऊस उत्पादकांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ऑक्टोबरमध्ये गाळप करणे शक्य होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्या संचालकांना ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व कारखान्यांतील तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची मंजूरी घेऊनच दुरुस्ती, यंत्रसामुग्री बदलाची कामे केली जातील. यापुर्वी दुरुस्तीच्या नावावर घोटाळे केले जात होते. ते रोखण्यासाठी समिती स्थापन केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. रोहतक साखर कारखान्यात रिफाईंड साखर निर्मिती केली जात आहे. ही साखर जादा दराने विक्री केली जाते. याशिवाय गूळ उत्पादनाबाबत काम सुरू आहे असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link