नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय तसेच पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना इथेनॉल आणि बायोगॅसच्या उपायोगाचे अनुभव ऐकले.
कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी इथेनॉल हा २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्यक्रम आहे असे सांगितले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील विविध राज्यांतील शेतकऱ्यांशी इथेनॉलबाबतही चर्चा केली.
या कार्यक्रमावेळई पंतप्रधानांनी भारतातील २०२०-२०२१ या कालावधीत इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाबाबत तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल मांडला. ते म्हणाले, गेल्या ७-८ वर्षांआधी भारतात इथेनॉलबाबत अधिक चर्चा होत नव्हती. मात्र, आता इथेनॉलवर भर दिला जात आहे. हे पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या आयुष्यालाही फायदेशीर होऊ शकेल.
पंतप्रधान म्हणाले, इथेनॉल उत्पादनातून अनेक गोष्टींचा फायदा होईल. भारताचा तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होईल. आणि साखर कारखान्यांची आर्थिक समस्येतून सुटका होईल. यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणे सुलभ होईल.