नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात यापूर्वी सत्तेवर असलेल्या सरकारने इथेनॉल मिश्रण कार्यक्रम गांभीर्याने घेतला नाही. पण, आता येत्या चार वर्षांत इथेनॉलची निर्मिती तिप्पट होणार आहे असून, त्याची ४ कोटी पन्नास लाख लिटर उत्पादन होईल. त्यामुळे १२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘वर्ल्ड बायोफ्युअल डे’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. पण, त्यानंतर आलेल्या सरकारने इथेनॉलला फारसे गांभीर्याने घेतले नाही. आता मात्र येत्या चार वर्षांत १ कोटी ४१ लाख लिटर वरून इथेनॉलचे उत्पादन ४ कोटी ५० लाख लिटर पर्यंत जाणार आहे. त्यामुळे देशाच्या महसूलाची १२ हजार कोटींची बचत होईल. ’
भारताच्या एकूण गरजेच्या ८० टक्के इंधन आयात करावे लागते. त्यामुळे वीज, अपारंपरिक ऊर्जा यांच्या बरोबरच बायोफ्युअलचा वापर करून आयातीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशात १२ बायोफ्युअल रिफायनरीजसाठी ….. रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण होणार आहे. तसेच पुढे २०३०पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होणार आहे.’ त्याचबरोबर एका रिफायनरीमध्ये हजार ते दीड हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
बायोफ्युअलच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांची मिळकत वाढणार असून, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे मतही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशात १७५ बायो-सीएनजी प्लँट उभारण्यात आले आहेत. आशा आहे की, देशात लवकरच त्या इंधनावर वाहने धावताना दिसतील.’ देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी १४ खरीप पिकांना दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्राच्या नॅशनल बायोफ्युएल धोरणानुसार बायोफ्युएलच्या प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्यासाठी पर्वेश पोर्टल लॉन्च करण्यात आल्याचेही मोदी यांनी सांगितले.