भोपाळ/नागपूर : राज्यातील बांबू उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून फायदा झाला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली इथेनॉल प्लांट उभारण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही उत्पादित इथेनॉल इंधनाचा पेट्रोल, डिझेलमध्ये वापर करून परकीय चलनाची बचत करण्याचा प्रयत्न करण्यासह पर्यावरण रक्षणासाठीही काम करू. त्यामुळे राज्यात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या संकल्पनेनुसार विदर्भात लोकप्रिय झालेल्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन आणि इतर नव्या संकल्पनांचाही स्वीकार केला जाईल. चौहान नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने आयोजित ॲग्रो व्हिजन कार्यक्रमात बोलत होते. या प्रदर्शनासोबत कार्यशाळा तथा मेळाव्यातील विविध कार्यक्रम सुरू राहाणार आहेत. मुख्यमंत्री चौहान यांनी दीप प्रज्वलन करून ॲग्रो व्हिजनचा प्रारंभ केला. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशातील कृषी क्षेत्र समृद्ध बनविण्यासाठी ५ सुत्री रणनीती लागू केली जाईल. यात उत्पादन वाढविणे, खर्च कपात, पिकांना योग्य दर देणे, योग्य नुकसान भरपाई आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.