श्री रामेश्वर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत इथेनॉल प्रकल्पास मंजुरी

भोकरदन : रामेश्वर साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इथेनॉल निर्मितीसह आसवनी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. कारखान्याचे चेअरमन विजयसिंह परिहार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस आमदार संतोष दानवे प्रमुख उपस्थित होते. यावेळी ३० केएलपीडी क्षमतेचा आसवनी प्रकल्प उभारणीचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष विजयसिंह परिहार यांनी अहवाल सादर केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेऊन कारखान्याची वाटचाल सुरु आहे. हजारो शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या पाठबळावर कारखाना साखर उद्योगात आदर्श निर्माण करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक ई. आर. कोलते यांनी सभेसमोरील विषयाचे वाचन केले. आमदार संतोष दानवे म्हणाले की, भोकरदन आणि जाफराबाद येथील ऊस उत्पादकांनी या श्री रामेश्वर कारखान्यालाच ऊस पुरवठा करावा. संकटाच्या काळात हाच कारखाना तुमच्या पाठीशी उभा राहील. गाळप ह्नागम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संचालक गणेश फुके के. पी. थोटे, शरद घायवट, जी. एम. मोरे, दिनकर लोखंडे, नायबराव घायवट, विजय दाभाडे, दादाराव गावंडे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here