सातारा : खटाव – माण ॲग्रो प्रो. लिमिटेड पडळ कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प यावर्षी सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा निश्चितच होईल. शेतकऱ्यांच्या इतर कारखान्यांपेक्षा ज्यादा दर देता येणे शक्य होईल, असे प्रतिपादन खटाव-माण ॲग्रो प्रोलिमिटेड, पडळ कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
खटाव-माण ॲग्रो प्रो. लिमिटेडच्या पाचव्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. त्यावेळी घार्गे बोलत होते. चेअरमन घार्गे म्हणाले की, लवकरच सुरू होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे गतवर्षीपेक्षा जादा, अपेक्षित व चांगला दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या दुष्काळाचे संकट आहे. तरीही शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी काम केले जाईल. यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही जादा दर देण्याचे प्रयत्न राहतील.
कारखान्याचे को- चेअरमन मनोज घोरपडे म्हणाले की, दरवर्षी या कारखान्याच्या गळीपाचा आलेख वाढता आहे. चालू हंगामात देखील अन्य कारखान्यांपेक्षा हा कारखाना मागे राहणार नाही. दररोज एक लाख वीस हजार लिटर इथेनॉल तयार करणारा महाराष्ट्रातील हा एकमेव कारखाना असेल. गेल्यावर्षीप्रमाणेच क्रशिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे म्हणाले की, २०१७ साली कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. ज्यांना काट्याची शंका कारखान्याचा प्रारंभ झाला. ज्यांना उसाच्या वजनाची खानी नसेल त्यांनी खात्री करून घेऊन मगच ऊस घालावा. यावेळी संचालक विक्रम घोरपडे, प्रीती घार्गे, महेश घार्गे, इंदिरा घार्गे, मंगलाताई शेडगे, प्रकाश घार्गे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे आदी उपस्थित होते. जनरल मॅनेजर अशोक नलावडे यांनी आभार मानले.