भंडारा : केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाला गती येईल. याशिवाय जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन केल्यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि जिल्ह्यात आर्थिक क्रांती शक्य आहे, असे प्रतीपादन खासदार सुनील मेढे यांनी केले.
रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साकोली व लाखने येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या फ्लायओव्हरचे लोकार्पण समारंभात भंडारा जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची घोषणा केली होती.
याबाबत दैनिक नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्यात ६०० कोटी रुपये खर्चून चार लाख लिटर इथेनॉल क्षमतेची एक योजना लवकरच स्थापन केली जाणार आहे. सुनील मेढे यांनी सांगितले की, या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. ही योजना जिल्ह्यासाठी क्रांतिकारी ठरेल. खासदार मेढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामुळे भंडारा जिल्ह्यात अनेक विकासकामे, नव्या योजना शक्य झाल्या आहेत. त्यांनी गडकरी यांचे कौतुक करताना इथेनॉल प्रकल्प लवकरात लवकर सुरू केला जावा अशी मागणी केली.