हरियाणातील सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प उभारणार : सहकार मंत्री अरविंद शर्मा

सोनीपत : हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हरियाणातील सर्व साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलचे प्लांट उभारले जात आहेत, असे सहकार मंत्री अरविंद शर्मा यांनी सांगितले. हे काम यापूर्वीच सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. डेली ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मंत्री अरविंद शर्मा यांनी अहुलाना (गोहाना) येथे चौधरी देवीलाल सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या गळीत हंगामाचे उदघाटन गव्हाणीत मोळी टाकून केले.

मंत्री शर्मा म्हणाले की, अहुलाना साखर कारखाना हा या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक लाभ मिळावा यासाठी ऊस बिलांसाठी निश्चित करण्यात आलेली मुदत एक आठवड्याने कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गोहाना आणि बडोदा येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, येथील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

हरियाणा शुगर फेडरेशनचे अध्यक्ष धरमबीर डागर म्हणाले की, राज्यातील साखर कारखानदारी आधुनिक करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे. साखर कारखान्यांमध्ये गूळ आणि साखर बनवणेही सुरू झाले आहे. कारखान्यांमध्ये बायोगॅस बनवण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत. गोहाना कारखान्यामध्येही रिफाइंड साखरेचे उत्पादन होणार आहे. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अंकिता वर्मा, एसडीएम अंजली श्रोत्रिया, ज्येष्ठ नेते प्रदीप सांगवान, बलराम कौशिक, राममेहर राठी, डॉ.ओमप्रकाश शर्मा, बलजीत मलिक आदी उपस्थित होते. मंत्री अरविंद शर्मा यांनी गेल्या हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल मुंदलाना गावातील शेतकरी पवन आणि भैंसवाल मिठन गावचे शेतकरी दर्शन यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here