देशातील तेल कंपन्यांना मागणीच्या तुलनेत निम्माच इथेनॉल पुरवठा

कोल्हापूर : केंद्र सरकारने गेल्या हंगामात आणलेल्या इथेनॉल प्रकल्पांवरील निर्बंधाचे सावट इथेनॉल निर्मिती आणि पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. इथेनॉल पुरवठ्याचा भार अजूनही साखर उद्योगावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मे अखेरपर्यंत देशाने सुमारे १२.४८ टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा पार केला. इथेनॉलचा तेल कंपन्यांशी साखर व धान्य आधारित मिळून झालेला करार ६४७ कोटी लिटरचा होता. यापैकी ३२८ कोटी लिटरचा पुरवठा मेअखेर तेल कंपन्यांना झाला आहे.

तेल कंपन्यांना उसाच्या रसापासून ६४ कोटी लिटर इथेनॉलचा करार होता. त्यापैकी ५४ कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. बी-हेवी मोलॅसेस ११३ कोटी लिटरचा करार झाला तर पुरवठा ५४ कोटी लिटरचा झाला आहे. सी हेवी मोलॅसेसच्या माध्यमातून तयार झालेल्या इथेनॉलचा ८२ कोटी लिटरचा करार झाला. तर पुरवठा २८ कोटी लिटरचा झाला. फेब्रुवारीअखेर पर्यंत मिश्रणाचे प्रमाण ११.६० टक्के होते. साखर आधारित प्रकल्पांमधून २३१ कोटी लिटरचा करार झाला होता. यापैकी उद्योगातून १६६ कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला. सध्या उसाचा हंगाम संपला आहे. बी हेवी, सी हेवी मोलॅसिसपासून अजूनही इथेनॉल तयार होवू शकते. पण साखर आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती पुढील हंगाम सुरू होईपर्यंत थंडावण्याची शक्यता आहे. केंद्राने इथेनॉल निर्मितीला जोर दिला असला तरी कमी उत्पादनामुळे मक्यापासून इथेनॉल निर्मितीवरही मर्यादा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here