नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात ऊर्जा सुरक्षेच्या मजबुतीसाठी महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे या हंगामात साखर क्षेत्रातून इथेनॉलचा पुरवठा वाढेल अशी अपेक्षा आहे. कारण साखर कारखान्यांकडून जानेवारीपासून दर महिन्याला ४-५ नव्या डिस्टिलरी अथवा त्यांचे विस्तारीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय, आगामी काही महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांकडून (ओएमसी) इथेनॉल खरेदीवर जोर दिला जाईल अशी अपेक्षा साखर उद्योगाला आहे.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ओएमसींनी सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (डिसेंबर २०२१-नोव्हेंबर २०२२) ४५९ कोटी लिटर इथेनॉल खरेदीसाठी निविदा जारी केल्या आहेत. १६ जानेवारीपर्यंत ३६९.४ कोटी लिटरचे ऑफर लेटर्सही जारी केले आहेत. तसेच ओएमसींना १६ जानेवारीपर्यंत ४१.४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, आम्ही सध्याच्या हंगामात १ डिसेबरपासून आतापर्यंत ८.६ टक्के इथेनॉल उत्पादनाचे उद्दीष्ट गाठले आहे. जानेवारीपासून दर महिन्याला ४-५ नव्या डिस्टिलरी येत आहेत. यामध्ये सध्याच्या काही युनिटचा विस्तारही सामील आहे.