पानीपत : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (आयओसीएल) पानीपत येथील रिफायनरीमध्ये २-जी इथेनॉल प्लांटच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्लांटचे व्हर्च्युअल उद्घाटन करतील. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी प्लांटमध्ये उपस्थित राहतील. ३६ एकर जमिनीवर तयार झालेल्या या प्लांटच्या उभारणीसाठी ९०९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्लांटची निर्मिती प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडने केली आहे. प्लांटमध्ये प्रतीदिन एक लाख लिटर जैवइंधन इथेनॉलचे उत्पादन होईल. तर इथेनॉलचे उत्पादन पिकातून शिल्लक राहणाऱ्या उर्वरीत घटकांपासून केले जाईल.
हरिभूमी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, २ जी प्लांटचे प्रशासन विविध माध्यमातून शेतकऱ्यांकडून पिकांचे उर्वरीत घटक, पाचट आदी खरेदी करेल. इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये पेट्रोलसोबत सहाय्यक इंधन म्हणून केला जाईल. प्लांटमध्ये एक लाख लिटर इंधन उत्पादन करण्यासाठी दररोज ४७३ टन पिकांच्या उर्वरीत घटकांची गरज भासेल. इथेनॉल प्लांट चालविण्यासाठी पानीपत रिफायनरीतून निर्माण होणाऱ्या विविध गॅसचा वापर होईल. २-जी इथेनॉल प्लांटच्या निर्मितीमुळे पंजाब, हरियाणा आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली अंतर्गत येणाऱ्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या विभागातील प्रदूषण कमी होईल. पाचट आणि गव्हाच्या तुसाची विक्री केल्याने शेतकरी नफा मिळवू शकतील. शेतकऱ्यांना वार्षिक २० कोटी रुपयांची कमाई होईल असे अनुमान आहे. प्लांटमधून २,००० लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.