पुणे : केंद्र सरकार ने अन्नधान्यापासून इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले आहेत. त्यात मका उत्पादन वाढविण्यासाठी सरकार गांभीर्याने पावले उचलत आहे. त्यामुळे भविष्यात इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. इतकेच नाही तर मागील काही महिन्यांपासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे निर्यात कमी होत आहे. देशातील मका उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढल्यानंतर किमती आणखी वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मागील हंगामात देशात ३५९ लाख टन मका उत्पादन झाले. यंदा ते ३४३ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. यंदा यंदा खरीप हंगामात पाऊस कमी होता. याचा फटका मका पिकाला बसला. लागवडही काही प्रमाणात घटली. त्यामुळे एकूणच उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या मका उत्पादक राज्यांमध्ये उत्पादकता घटली आहे. मागील हंगामात देशातून जवळपास ३२ लाख टन मका निर्यात झाली. यंदा ३१ लाख टनांवर निर्यात स्थिरावू शकते, असा अंदाज अभ्यासकांचा आहे.