गुवाहटी : इथेनॉल मिश्रण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतलेला कार्यक्रम आहे. त्यापासून सरकारी तिजोरीत खूप बचत होईल आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी ते साह्यभूत ठरेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले. मंत्री तेली यांनी आसाम येथे सांगितले की, इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी केवळ भारतच नव्हे तर जगभरातील वाहन निर्मात्यांसोबत संयुक्त अभ्यास करण्यात आला आहे. ब्राझीलसारख्या देशात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांचे उदाहरण देऊन तेली म्हणाले, आगामी काळात किमान मिश्रण १० टक्के आणि २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची गरज आहे. आसाम बायो-रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेडही इथेनॉल उत्पादनासाठी नुमालीगड येथे प्लांट स्थापन करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी बांबूचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी फिनलँडकडून तांत्रिक साहाय्य घेण्यात आले आहे.
मंत्री म्हणाले, कच्च्या तेलाची आयात कमी होण्यासह देशाची आर्थिक बचत करण्यास याची मदत मिळेल. आसाममध्ये बायो रिफायनरीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी संयुक्तपणे खूप संशोधन आणि गुंतवणूक करण्यात आली आहे. बांबू ग्रामीण उत्पादन क्षेत्रापासून उपलब्ध होणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला अधिक समृद्ध होण्यास मदत मिळेल. मंत्री तेली यांनी इंडियन ऑईलच्या गुवाहटी टर्मिनलला (बेतकुची) भेट दिली. उपलब्ध सुविधांची माहिती घेत टर्मिनलच्या विकासाबाबत, योजनांबाबत चर्चा केली.