न्युयॉर्क : भारताच्या तुलनेत युरोपने रशियाकडून सहा पट फॉसिल फ्यूएलची (जीवाश्म इंधन) आयात केली आहे, अशी टिप्पणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी करत पुन्हा एकदा युरोपची खिल्ली उडवली आहे. Russia’s War Could Make It India’s World’ या शिर्षकाखाली आलेल्या न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तात म्हटले आहे की, युक्रेन युद्धाच्या जटिल प्रभावाने देशाच्या विकासाला प्रोत्साहन दिले आहे. न्युयॉर्क टाइम्समधील वृत्तामध्ये म्हटले आहे की, भारत त्याच्या प्रचंड देशांतर्गत बाजारपेठेमुळे आर्थिक गोंधळापासून तुलनेने सुरक्षित आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यात जयशंकर यांनी रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीबाबत भारताच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले होते. आणि त्यांनी सांगितले होते की, जेथे भारतीय नागरिकांच्या हिताचा सर्वात चांगला सौदा असेल, तेथे जाणे हे सरकारचे योग्य धोरण आहे. मंत्री जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांकडून रशियाकडील ऊर्जेवर लागू केलेल्या “ऊर्जा मर्यादा” धोरणाबाबत ऊर्जा बाजारातील स्थिरता आणि त्याच्या परवडण्याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली.
जयशंकर यांनी सांगितले की, आम्ही आपल्या कंपन्यांना रशियाकडून इंधन खरेदी करण्यासाठी सांगत नाही, तर आम्ही त्यांना सर्वात चांगला पर्याय शोधण्यासाठी सांगितले आहे. जयशंकर यांनी संसदेतील शीतकालीन सत्राच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत बोलताना सांगितले की, कोठे खरेदी करायची हे बाजारावर अवलंबून आहे. जेव्हा भारतीय लोकांच्या हिताचा सर्वात चांगला सौदा असेल, तेथेच जाणे हे शहाणपणाचे काम आहे. फेब्रुवारीत सुरू होणाऱ्या युक्रेन युद्धाचा जागतिक अन्न सुरक्षेवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. आणि रशियावर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे.
जागतिक तेलाच्या किमतींवर जयशंकर यांनी सागंतिले की, जगभरातील इंधन आणि गॅसच्या किमती अधिक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, युरोप मध्य-पूर्वेतील देशांकडून अधिक इंधन खरेदी करीत होता, जे देश आशियाचे पारंपरिक पुरवठादार होते. मात्र, आता त्यांना युरोपकडे वळविले आहे. भारताचे तेल आयात धोरण राष्ट्रीय हितावर अवलंबून असेल असेही जयशंकर यांनी सांगितले.