कोल्हापूर : राज्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजून काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचा सर्वाधिक त्रास ऊसतोड मजुरांना सहन करावा लागत आहे. भर उन्हात ऊसतोडीसह वाहतूक करावी लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यापुढे ऊन काहीच नसल्याचे हे मजूर सांगत आहेत.
कडक उन्हामध्ये ऊसतोड मजूर जिवावर उदार होऊन ऊसतोडीसह कारख्यान्यात वाहतूक करीत आहेत. अनेक जण भल्या पहाटे फडात जात ऊसतोड करीत आहेत. मुलांचेही मोठे हाल होत आहेत. ऊसतोडीसह त्याची शेतातून बांधापर्यंत वाहतूक करणे, पुढे कारखान्यापर्यंत ऊस बैलगाडीतून नेणे आदी कामे उन्हातच करावी लागत आहेत. अनेकदा डांबरी रस्त्यावरून जाताना बैलांनाही उष्माघाताचा त्रास होत आहे.