अहिल्यानगर : ज्ञानेश्वर साखर कारखान्याने या हंगामात ११ लाख ४० हजार मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ५१ हजार साखर निर्मिती केली आहे. सहवीज प्रकल्पातून ५ कोटी युनिट वीज निर्यात करण्यात आली. डिस्टिलरीतून १ कोटी ५० लाख लिटर रेक्टिफाइड स्पिरीट व १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉलचे निर्मिती होणार आहे. डिस्टिलरी विस्तारीकरण, आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
संचालक शिवाजी कोलते व निर्मला कोलते यांच्या हस्ते ऊस गव्हाण पूजन करण्यात आले. ऊस तोडणी मुकादम, मजूर, वाहतूकदार, ऊसतोड यंत्र मालक, ठेकेदार, कार्यकारी संचालक व सर्व खाते प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, संचालक काकासाहेब शिंदे, प्रा. नारायण म्हस्के, मच्छिंद्र म्हस्के, पंडितराव भोसले, बबनराव भुसारी आदी उपस्थित होते.