नजीबाबाद : आधीच्या सरकारांकडून साखर कारखान्यांची विक्री केली जात होती. मात्र, आम्ही साखर कारखाने वाचवून ऊस उत्पादन वाढवले आहे असे उत्तर प्रदेशचे ऊस विकास राज्यमंत्री संजय गंगवार यांनी सांगितले. या अंतर्गत आता नजीबाबाद साखर कारखान्याचे लवकरच विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया गतीने सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यमंत्री संजय गंगवार म्हणाले की, राज्य सरकारने साखर कारखान्यांचा बचाव करणे, ऊस उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने कामे केली आहेत. योगी सरकारने यासाठी खास प्रक्रिया राबवली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत. आधीच्या सरकारांनी १९ साखर कारखान्यांची विक्री केली. मात्र, आम्ही एकाही कारखान्याची विक्री केलेली नाही. यावेळी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुखबीर सिंह, सीसीओ डॉ. एस. एस. ढाका उपस्थित होते. भाजप नेते राजीव अग्रवाल, साखर कारखाना व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष लोकेंद्र सिंह, राहुल तिवारी, बलराज सिंह त्यागी यांनी मंत्र्यांचे स्वागत केले.
यावेळी शेतकरी सहकारी साखर कारखाना तथा कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनचे विभागीय उपाध्यक्ष धर्मपाल सिंह चौहान, सत्येंद्र गौतम यांनी मंत्र्यांना चार मागण्यांचे निवेदन दिले. साखर कारखाना आणि आसवनी कर्मचारी यांच्या वेतनातील विसंगती दूर करावी, दहा वर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे आदी मागण्या त्यांनी मांडल्या.