नवी दिल्ली : भारतात कोविड १९च्या नव्या ओमीक्रॉन व्हायरसच्या फैलावाच्या धास्तीनंतरही साखर उद्योगाला चांगल्या निर्यातीची अपेक्षा आहे. अनेक आफ्रिकन देश भारतीय साखरेसाठी महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहेत. त्यामध्ये बहुतांश उत्तर महाद्वीपात आहेत. ओमीक्रॉनचा आढळ दक्षिण महाद्वीपात झाला आहे.
दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, कोविड १९च्या संक्रमणाच्या दोन लाटांमध्ये निर्यातीचे जास्त नुकसान झालेले नाही. या विषाणूच्या प्रकोपादरम्यानही भारताने दोन्ही हंगामात साखरेची निर्यात अधिक बळकट केली. हंगाम २०१९-२० मध्ये भारताने ५९.५० लाख टन निर्यात केली. तर २०२०-२१ मध्ये देशाने ७१ लाख टनापर्यंत साखर निर्यात केली आहे.
वर्मा यांनी सांगितले की, या हंगामात आम्हाला ६० लाख टन निर्यातीची अपेक्षा आहे. यामध्ये सोमालिया, इथिओपिया यांसारखे आफ्रिकेतील देश भारतीय साखरेची महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहेत. वर्मा यांनी सांगितले की, उद्योगाने कोरोना संक्रमणाचे परिणाम आणि विक्री तसेच निर्यातीचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय शोधले आहेत. लॉकडाउनच्या काळात कामगारांच्या टंचाईची समस्या, कंटेनर मिळविणे अवघड होते. मात्र, एकूण उद्योगाने चांगली निर्यात केली आहे. नव्या कोविड विषाणूच्या लाटेतही या हंगामात चांगली निर्यात होईल अशी अपेक्षा वर्मा यांनी व्यक्त केली.