पुणे : अधिकाधिक ऊस उत्पादन मिळविण्याच्या प्रक्रियेत शुद्ध व गुणवत्तापूर्ण बेणे उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये दर्जेदार बेणे तयार करताना त्रिस्तरीय बेणेमळा व्यवस्थापन करावे. उसाचे बेणे किमान ३ ते ५ वर्षांतून एकदा बदलावे असा सल्ला मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील डॉ.अभिनंदन पाटील, डॉ.गणेश पवार, डॉ.अशोक कडलग यांनी दिला आहे. प्रत्येक वर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील किमान ३३ टक्के क्षेत्रावरील बेणे बदल आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन, उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यास बरीच मदत होईल अशी सूचनाही शास्त्रज्ञांनी केली आहे.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संशोधकांनी सांगितले की, राज्यात उसाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे बेण्याच्या शुद्धतेकडे व गुणवत्तेकडे होणारे दुर्लक्ष. बऱ्याच वेळा लागणीसाठी घाई केल्यामुळे चाऱ्यासाठी व गाळपासाठी जाणाऱ्या अतिपक्क तसेच पैशाअभावी खोडवा पिकातील बेणे लागणीसाठी वापरले जाते. तसे केल्यास अशा बेण्यांची उगवण कमी व एकसारखी होत नाही, तसेच फुटवे जोमदार येत नाहीत. तूट न भरल्यास प्रति हेक्टरी गाळपा योग्य उसाची अपेक्षित एक लाख संख्या मिळत नाही. त्यामुळे एकूण ऊस उत्पादनात खूपच घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जातो. यासाठी त्रिस्तरीय बेणे मळा व्यवस्थापन गरजेचे आहे. याअंतर्गत बेण्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करावी. उष्ण हवा/ उष्ण बाष्प हवा अशी प्रक्रियाही गरजेची आहे. ही प्रक्रिया काणी या रोगाच्या निर्मूलनासाठी उपयुक्त आहे. मूलभूत बेणे (ब्रीडर सीड) ऊस संशोधन केंद्रांकडून मिळवावे. तसेच मूलभूत बेण्यापासून तयार झालेल्या बेण्यास पायाभूत बेणे म्हणतात. हे बेणे कारखाना प्रक्षेत्रावर किंवा निवडक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात तयार केले जाते.
तज्ज्ञांनी सांगितले की, त्यानंतरचा टप्पा हा प्रामाणिक बेणे (सर्टिफाइड सीड) असतो. पायाभूत बेण्यापासून प्रमाणित बेणेमळा तयार करण्यासाठी हे बेणे वापरले जाते. हा बेणेमळा कारखान्याच्या ऊस विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावा. वेळोवेळी ऊस शास्त्रज्ञांकडून तपासणी करून घ्यावा. प्रमाणित बेणे शेतकऱ्यांनी किमान ३ ते ५ वर्षातून एकदा बदलणे आवश्यक आहे. बेणे बदल न केल्यास उसाच्या जातीचे मूळ गुणधर्म काही अंशी बदलतात. त्यांची उत्पादन क्षमता, रोग व कीड प्रतिकारक शक्ती कमी होऊन उत्पादनात घट येते. ऊतिसंवर्धित रोपांचा वापर केल्यास पायाभूत बेणे मळ्याचे गुणन निश्चितपणे १:२५ पेक्षा जास्त मिळते. उती संवर्धित रोपापासून १ गुंठा क्षेत्रावरती साधारणपणे १२० ते १५० रोपे लावून त्याचे १:२५ गुणन केल्यास १ गुंठ्यातून एक हेक्टर एवढी उसाचे पायाभूत बेण्यासाठी लागवड करता येईल.