पुणे : सध्या राज्यातील ऊस पिकाला बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अलिकडे चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होत असून लागण ऊसापेक्षा खोडवा उसात याचे प्रमाण जास्त आढळते. या रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये २९ टक्के; तर खोडवा पिकात ७० टक्यांपर्यंत उत्पादनामध्ये नुकसान होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आवाहन आचार्य पदवीचे विद्यार्थी रवींद्र पालकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. गणेश कोटगिरे आणि डॉ. अभयकुमार बागडे या तज्ज्ञांनी केले आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, या रोगाचा प्रसार मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तर दुय्यम प्रसार हवा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत पसरतो. त्याचे रोग नियंत्रण करण्यासाठी निरोगी बेणे वापरावे. रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा. तसेच लागवडीच्या उसात ५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल तर असा खोडवा राखू नये. याचबरोबर ऊस बेण्यास लागवडीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राद्वारे ५४ अंश सेल्सिअस तापमानात १५० मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर लागणीपूर्वी बेण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात प्रक्रिया करावी, अशी शिफारस ‘ॲग्रेस्को’ने केली आहे. पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये आणि शेतात काणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा. नंतर संपूर्ण बेट मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे असे डॉ. गणेश कोटगिरे यांनी सांगितले.