जागतिक बाजारात भारतीय अन्नधान्याची मागणी वाढली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये प्रमुख कमोडिटी निर्यातीत १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्यातीवर काही निर्बंध लागू केल्यानंतरही तांदूळ निर्यात वाढली असून गव्हाच्या निर्यातीत घट नोंदविण्यात आली आहे.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादक निर्यात विकास प्राधिकरणाकडून (अपेडा) उपलब्ध आकडेवारीतून दिसून येते की, वर्ष २०२२-२३ मध्ये २,१४,४३० कोटी रुपये किमतीच्या प्रमुख कमोडिटीची निर्यात झाली. वर्ष २०२१-२२ मध्ये झालेल्या १,८३,२५० कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात जवळपास १७ टक्क्यांनी अधिक आहे. डॉलरच्या रुपातील निर्यात ८.७४ टक्क्यांनी वाढून २६,७१८ डॉलर झाली.
गेल्या आर्थिक वर्षात १,११,०५० कोटी रुपयांच्या धान्याची निर्यात झाली. धान्य निर्यातीत १५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. यामध्येही सर्वाधिक निर्यात ५१,०८९ कोटी रुपये मूल्याच्या १,७७,८६,५५७ टन नॉन बासमती तांदळाची झाली आहे. तर ३८,५२४ कोटी रुपये मूल्याच्या ४५,६०,५६२ टन बासमती तांदळाची निर्यात झाली. केंद्राने लागू केलेल्या निर्बंधांनंतर गेल्या ७-८ महिन्यात गव्हाची निर्यात झालेली नाही. त्यामुळे या वर्षात ११,८२७ कोटी रुपयांच्या ४६,९३,२९२ कोटी टन गव्हाची निर्यात करण्यात आली. गहू निर्यातीत २५.३६ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.