नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्यानंतरही जगभरातील मोठ्या बाजारातून वस्तूंची मागणी चढीच असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (फियो) अध्यक्ष एस. के. सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश राज्यांनी कोरोनामुळे अंशतः अथवा पूर्ण लॉकडाउन लागू केला असता तरी मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यात सेवेशी संबंधीत घटकांना सवलत दिली आहे. केंद्र सरकारनेही आंतरराज्य दळणवळणाबाबत सकारात्मक भूमिका राखली आहे.
अध्यक्ष सराफ यांनी सांगितले की, कोरोनामुळे उद्योगांना थोड्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे अडचणीचे आहे. कोरोनाची ही दुसरी लाट मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कमी होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल. भारतीय उद्योग जगताला, निर्यातदारांकडे मोठ्या बाजारातून मागणी वाढत आहे. त्यामुळे निर्यातीत वाढीची अपेक्षा आहे.
अनेक राज्यांनी लॉकडाऊन अथवा शटडाऊन परिस्थितीत निर्यातदारांना सवलत दिली आहे. अशा प्रकारच्या अडचणींना निर्यातदार आधीच सामोरे गेले आहेत. त्यामुळे मालाच्या डिलिव्हरीचा कालावधी त्यांनी वाढवून घेतला आहे. परस्पर सहकार्य, विश्वासावर काम सुरू असल्याचे अध्यक्ष सराफ म्हणाले.
फियोने सरकारला मर्चेंटाइज एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया योजनेंतर्गत २०२०-२१ च्या डिसेंबर २०२० पर्यंत आणि सर्व्हिसेस एक्स्पोर्टस फ्रॉम इंडिया स्कीमअंतर्गत फायलिंग सुविधा सुरू करण्याचा आग्रह केला आहे. लुधियानातील हँड टूल्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. सी. रल्हन यांनी सांगितले की इंजिनीअरिंग क्षेत्रात चांगल्या ऑर्डर्स आहेत. अमेरिका, युरोपमधून मागणी वाढली आहे. एप्रिलमध्ये निर्यात वाढून ३०.२१ अब्ज डॉलरवर पोहोचली. तर या कालावधीतील व्यापार तूट १५.२४ अब्ज डॉलरवर आली आहे.