नवी दिल्ली : दिल्लीच्या काही भागात बुधवारी उष्णतेच्या तीव्र लाटेसह कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार दीर्घ कालावधीच्या कोरड्या हवामानामुळे उत्तर, पश्चिम भारतात उकाडा वाढला आहे. पुढील चार ते पाच दिवस उत्तर पश्चिम, मध्य तसेच पश्चिम भारतात उष्णतेची लाट पुढे सरकेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमडीच्या निकषानुसार सपाट भूप्रदेशात ४० डिग्री तापमान अथवा सामान्यपेक्षा ४.५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक गरम हवा असेल तर उष्णतेची लाट घोषीत केली जाते. सामान्य स्थितीपेक्षा ६.४ डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर उष्णतेची तीव्र लाट असेल म्हटले जाते. दिल्लीत काही भागात मंगळवारीही उष्णतेच्या तीव्र लाटेची स्थिती होती. आठ हवामान केंद्रांपैकी बहुतांश ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. तर नरेला, पितमपुरी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केंद्रावर ४१ डिग्री सेल्सिअस तापमान होते. आणखी तीन ते चार दिवस अशी लाट येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ३० मार्च रोजी कमाल तापमान ४०.१ डिग्री सेल्सिअस नोंदवले होते.