ओडिशा, आंध्र, पश्चिम बंगालमध्ये आज ‘आसनी’ चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली : ‘आसनी’ चक्रीवादळ आज, १० मे रोजी संध्याकाळपर्यंत वायव्य दिशेने सरकणार आहे, परिणामी आंध्र, ओडिशा आणि पश्चिम बंगाललगतच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल ही पूर्वेकडील भारतीय राज्ये ‘आसनी’ चा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. हे चक्रीवादळ पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात तीव्र होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, हे चक्रीवादळ १०, ११ आणि १२ मे रोजी अधिक तीव्र होईल. त्यामुळे आंध्र, ओडिशा आणि पश्चिम बंगाल लगतच्या किनारपट्टी भागात खूप मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे कालपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत असल्याने वादळाचा प्रभाव तीन राज्यांमध्ये आधीच जाणवत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितल्यानुसार सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ‘आसनी’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडापासून ३९० कि.मी. आग्नेयेकडे होते. तथापि, हे चक्रीवादळ १० मे रोजी संध्याकाळपर्यंत वायव्य दिशेने पुढे सरकेल. दरम्यान, ११ आणि १२ मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगाल लगतच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी सांगितले की १० मेच्या संध्याकाळपासून पाऊस सुरू होईल. ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरी या तीन जिल्ह्यांमध्ये पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील जगतसिंगपूर, पुरी, खुर्दा, कटक आणि गंजाम या पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीव्र चक्रीवादळ आज सकाळी ११.३० वाजेपर्यंत विशाखापट्टणमच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४५० किमी अंतरावर होते आणि पुढील २४ तासांत ते हळूहळू कमकुवत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here