कोल्हापूर: गडहिंग्लज उपविभागातील चार कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या उसाचे प्रती टन १०० रुपये दर देणे बाकी आहे. याशिवाय, कारखान्यांनी उसाची रिकव्हरी कमी दाखवून एफआरपी घटवली आहे. कारखान्यांनी या वर्षी साडेबाराच्या रिकव्हरीप्रमाणे दर द्यावा. चालू वर्षी किमान ३२०० रुपये पहिली उचल मिळावी यावर आम्ही ठाम आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याण्णावर यांनी केले. कारखानदार व शेतकरी संघटनेच्या अंतिम दरवाढ बैठकीत ते बोलत होते.
पाटणे फाटा येथे कारखानदारांना निवेदन दिल्यानंतर गड्यान्नावर म्हणाले की, दौलत कारखान्याने जाहीर केलेला रिकव्हरी रेशो आम्हाला मान्य नाही. ओलम कारखान्यानेही रिकव्हरी कमी दाखवली आहे. कर्नाटकातील उसाला रिकव्हरी कमी आहे. त्यामुळे रेशो कमी आणला आहे. तोडणी ओढणीचा दर जादा दाखवला आहे. तालुक्यात सर्वत्र हाय रिकव्हरी बेणं आहे. तरीही कारखानदार फसवणूक करत आहेत. इको केनने स्वतःच्या हितासाठी कर्नाटकातून ऊस खरेदी वाढवली आहे, असा आरोप गड्ड्याण्णावर यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, तानाजी देसाई यांनी लवकर दर जाहीर करून कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. साखर कारखान्यांनी साडेबाराच्या रेशोने एफआरपी द्यावी; अन्यथा कारखान्याच्या विरुद्ध आरपारचा लढा उभारू, असे शेतकऱ्यांनी सुनावले. ओलम शुगरकडून उत्तम कदम, शेतकऱ्यांची चे पांडुरंग पाटील व कर्मचारी अथर्वकडून युवराज पाटील, इको केनचे पांडुरंग पाटील, बाळाराम फडके,जगन्नाथ हुलजी, नवनीत पाटील, विश्वनाथ पाटील, मधुकर पाटील, बसावराज मुलाळे, सुभाष पाटील, प्रकाश वाईंगडे, जयवंत सुरुतकर उपस्थित होते.