सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर उतारा कमी दाखवून फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. गाळप हंगामात उसाचे उत्पादन घटल्यावर साखर उताराही घटल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, ऊस घटतो तेव्हा साखर उतारा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाज उठवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्यावर्षीची अतिवृष्टी, नंतरच्या पुरामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी उताऱ्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे. तयार झालेली सर्व साखर हिशेबात दाखवलेली नाही. या प्रकाराविरोधात आता आंदोलन केले जाईल. दरम्यान, एकरकमी एफआरपी देण्याबाबतच्या कायद्यात केलेला बदल उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करण्यात आली होती असे स्पष्ट झाले आहे. सर्व पक्षातील कारखानदारांनी मिळून केलेले षङयंत्र न्यायालयामुळे हाणून पाडण्यात यश आले आहे, असे शेट्टी यांनी संगितले. या निर्णयाने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे असे ते म्हणाले. यावेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.