सांगली जिल्ह्यात कारखान्यांची गाळप हंगामात होणार दमछाक

सांगली : जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या २० झाली असून १९ कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यात उसाचे एक लाख ३५ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा कमी पावसाचा परिणाम उसाच्या वाढीवर झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांना उसासाठी झगडावे लागण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील उसावर कर्नाटक सीमाभागातील कारखान्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचाही डोळा आहे. साखर कारखाने सध्या तोडणी वाहतुकीचे नियोजन करण्यात गुंतले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. भारत शुगर, रायगाव शुगर, गणपती जिल्हा संघाचा तुरची श्रीपतराव कदम, माणगंगा हे कारखाने यावर्षी गळीत हंगाम सुरू करणार आहेत. या कारखान्यांसमोर ऊस टंचाईचे मोठे संकट आहे. जिल्ह्यात २०२२-२३ च्या गळीत हंगामात एक लाख ३७ हजार ५८४.९ हेक्टर उसाचे क्षेत्र होते. त्यात यावर्षी एक हजार ८९६.९ हेक्टरने उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. २०२३-२४ च्या हंगामासाठी एक लाख ३५ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र आहे.

गतवर्षीच्या हंगामात १४ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. या कारखान्यांनी ८२ लाख २२ हजार ३१९ टन उसाचे गाळप करून ९२ लाख ५६५ हजार ७८२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. या गळीत हंगामामध्ये नव्या व जुन्या २० पैकी १९ कारखान्यांकडून गाळप होणार आहे यामध्ये बंद महांकाली कारखाना सोडल्यास उर्वरित चार कारखान्यांनी हंगामाची तयारी केली आहे. उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांनी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी रायगाव शुगर्सला परवानगी दिली आहे. कारखान्याची प्रतिदिन नऊ हजार टन ऊस गाळपाची क्षमता असून सध्या चाचणी गळीत हंगामासाठी प्रतिदिन दोन हजार टनाने गाळप सुरु आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here