सांगली : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर फॉर्म्युल्याप्रमाणे दर द्यावा. या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. जोपर्यंत दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला. बुर्ली (ता. पलूस) येथे ऊस दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. येत्या एक डिसेंबरला सकाळी १० वाजता राजारामबापू कारखाना साखराळे युनिट येथे शेतकऱ्यांनी काटा बंद आंदोलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजू शेट्टी म्हणाले की, जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी एफआरपी अधिक १०० रुपयाने पहिली उचल ३३०० पासून ते ३३७५ रुपये बसत असताना शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी ३१०० रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचे ९६ कोटी रुपयांचे नुकसान होईल. ज्या कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला २९०० रुपयांपुढे पहिली उचल दिली त्यांनी पन्नास रुपये द्यायचे आणि २९०० च्या आत रक्कम दिलेल्यांनी शंभर रुपये द्यायचे या धोरणामुळे ऊस उत्पादकांचे बारा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा डाव हाणून पाडणार आहे, असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी व आपल्या बापाच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी गावातील तरुणांनी गट तट विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय व्हावे. उपसरपंच उमेश पाटील, सभेचे अध्यक्ष भाऊसो पाटील उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक ए. टी. पाटील, आभार राहुल चव्हाण यांनी मानले. संजय बेले, बाळासो शिंदे, जयकुमार कोले, धन्यकुमार पाटील, बाळासाहेब बुद्रुक, अमोल पाटील, रावसो जाधव, संदीप चौगुले, संजय खोत, सुशांत चौगुले, संभा चिरोटे, संतोष पाटील, संदेश चौगुले, संजय चौगुले, सतीश चौगुले, इम्रान पटेल आदी उपस्थित होते.