नांदेड : गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अजूनही नांदेड मधील साखर कारखान्यांकडून देय आहेत. त्यामुळे पुढची पेरणी करण्यापूर्वी ही प्रलंबित असणारी ऊसाची रक्कम ऊस शेतकऱ्यांना मिळावी. ती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, अन्यथा शेतकऱ्यांसह उग्र आंदोलन करण्यात येईल, ऊसा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगाेले यांनी प्रशासनाला दिला आहे.
ऊस नियंत्रण कायद्यानुसार ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी अदा करावी असा नियम आहे. पण तरीही अनेक कारखान्यांकडून ही एफआरपी थकीत आहे. भाऊराव चव्हाण, पूर्णा, टोकाईसह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकवली आहे. पेरणीचे दिवस असतानाही जवळ पैसे नसल्याने ऊस शेतकरी अर्थिक अडचणीत आहेत.
त्यातच शेती मालाचे दर खुपच घटल्यामुळे शेतकरी विवंचनेत आहेत. हळदीचे दरही पडल्यामुळे हळद पाच ते सहा हजार क्विंटल पर्यंत खाली आहे. दुष्काळात तेरावा महिना या उक्ती प्रमाणे आधीच अडचणीत असलेले शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची थकीत एफआरपी लवकरात लवकर मिळावी, असा आग्रह इंगोली यांनी धरला आहे.
प्रशासनाने सर्व कारखान्यांना या आठवड्यात दहा जून पर्यंत थकबाकी शेतकऱ्यांना द्यावी, असे सांगितले आहे. कारखान्यांनी उसाची रक्कम वेळेवर द्यावी, यासाठी त्यांनी मुबंइ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली होती. यात अनेक कारखान्यांना थकीत एफआरपी द्यावी लागली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे असलेली थकीत एफआरपी देण्याची सुरुवात करुन पेरणी अगोदर शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.