नवी दिल्ली : साखर कारखान्यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या २०२०-२१ या गाळप वर्षात आतापर्यंत ४.३ मिलियन टन साखर निर्यात करण्याचे करार केले असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. केंद्र सरकारने साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी २०२०-२१ या हंगामातील ६ मिलियन टन साखर निर्यातीस मंजुरी दिली आहे. आतापर्यंत ४.३ मिलियन टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. सरकारने ३१ डिसेंबर २०२० रोजी निर्यातीचा कोटा मंजूर केल्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत हे करार केले गेल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली.
बंदरांवरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षासाठी मंजूर झालेल्या कोट्याच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० यांदरम्यान, ३,१८,००० टन साखर निर्यात केली गेली. इस्माने सांगितले की, चालू वर्षासाठी मंजूर केलेला शिपमेंट कोटा पाहता यावर्षी जानेवारी ते मार्च यांदरम्यान २.२ मिलियन टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने चालू २०२०-२१ या वर्षासाठी निर्यात आणि देशांतर्गत कोटा यात बदलाला परवानगी दिली आहे. त्याला कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नव्या आकडेवारीनुसार देशात १५ मार्चअखेर २५.८६ मिलियन टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत २१.६१ मिलियन टन उत्पादन झाले होते. यंदा महाराष्ट्रात ९.४ मिलयन टन, उत्तर प्रदेशमध्ये ८.४२ मिलियन टन आणि कर्नाटकात ४.१३ मिलियन टन साखर उत्पादन झाले आहे.