माजलगाव : शेतकरी कामगार पक्षातर्फे तालुक्यातील रोशनपुरी येथील रुपामाता गुळ कारखान्यावर बुधवारी शेतकरी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कारखान्याचे अधिकारी व ट्रॅक्टर चालक-मालक यांची भेट घेण्यात आली. यावेळी गेल्या वर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन तीन हजार रुपयाप्रमाणे बिले द्यावीत, आणि चालू हंगामात चार हजार रुपये दर जाहीर होणार नाही तोपर्यंत कारखाना आणि ऊस तोडी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
कारखाना प्रशासनाने गुरुवारपासून (दि.26) कारखाना बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच उसतोड सुरूच राहिल्यास गुरुवारपासून रुपामाता कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात येईल, असा इशारा भाई ॲड. नारायण गोले-पाटील यांनी दिला. यावेळी परमेश्वर डाके, सरपंच मुक्ताराम ताकट, उपसरपंच बाळू टेकाळे, बाजीराव ताकट, निवृत्ती मारगुडे, निवृत्ती डांगे, रामचंद्र डांगे, अनंत मारगुडे, गोविंद ताकट, लक्ष्मण ताकट, उत्तम डांगे, राजेभाऊ डांगे, भागवत ताकट, सुरेश टेकाळे, अण्णासाहेब ताकट आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.